कुल पेज दृश्य

मंगलवार, 19 फ़रवरी 2019

गाणी

अस्सं घर सुरेख बाई
बाळासंगे खेळतं
अस्सं खेळणं सुरेख बाई
नवीन काही शिकवतं!


बुडूश्शा  बुडूश्शा करू रे बाळा
पाण्यात खेळा आता पाण्यात खेळा
मऊ मऊ साबणाचा लावून फेस
भिजले बाळाचे रेशमी केस
डुबुक डुबुक करु रे बाळा
पाण्यात खेळा आता पाण्यात खेळा
इवल्याशा गालावर पाणी उडे
चाळणीतून बघ कसा पाऊस पडे
मज्जा मज्जा करू रे बाळा
पाण्यात खेळा आता पाण्यात खेळा


शांत, उबदार वातावरण
बाळाला झोप लागेल पटकन
अशी झोप लागता खास
मेंदूचा होतो छान विकास!-


नको ग मारू नको ग मारू
पिटुकल्या बाळाला नको ग मारू
मग काय करू ताई
किती ह्याचा दंगा
कामाच्या मध्ये मध्ये
याचा सुरू भोंगा
फटका दिल्याशिवाय
गप बसत न्हाई
तूच सांग मला
आता काय मी करू?
खरंय ग सखे
खरंय ग सखे
तुला खूप काम
पडतं ग बाई
पण मारणं हा काय
उपायच नाही
मारण्यानं बाळाचं
नुकसान होतं किती!
आयुष्यभराची ग
सोबती होते भीती!
छान छान शिकण्याचा
हाच तर काळ
प्रेमानं वागलं तर
हुश्शार होईल बाळ!
जरा रागाला
आवर तर घालून बघ
बाळाच्या मिठीत सापडेल
आनंदाचं जग!
- स्मिता पाटील


पिंकीची आई, रिंकीचे बाबा
मन्नोची आजी, रहमानची फुफा
चला चला लवकर चला
अंगणवाडीत आहे पालकसभा
मग काय मग काय विशेष काय?
ढीगभर काम  हितं पडलं हाय
कामाचंच सांगतात तिथं बाय
पोरांच्या भल्यासाठी समदं हाय।।
आपली मेहनत आपलं काम
कुणासाठी सांगा गळतो घाम?
वेगळं कायपन वाटत नाही
बाळाच्या संगे करायचं काम।।
जरा थोडा काढला तर वेळ
हुश्शार होईल की आपलंच बाळ
छान छान युक्त्यांची गुंफून माळ
मुलांचं करूया मोठं आभाळ।।
- स्मिता पाटील

शनिवार, 10 फ़रवरी 2018

इतके कसे तुटत जातो आपण
आपल्याच भवतालापासून?
जे जोडून ठेवण्याचा
केलेला असतो प्रयत्न प्राणपणानं.
खटकलेल्या कित्येक गोष्टी
मनाआड करून,
सांधलेली असतात
अनेक नाती लांबची जवळची!
संबंधांच्या साऱ्या अट्टाहासांचा अहं
कुरवाळलेला असतो हसत हसत;
स्वतःच्या अगणित इच्छांचा,
स्वप्नांचा बळी देऊन.
कधीतरी लक्षात येतोच
या सगळ्यातला फोलपणा.
कशासाठी आटापिटा केला आपण
जीव नसलेल्या नात्यांसाठी?
ज्यांना नको होतं त्यांना
कशासाठी वाटत राहिलो प्रेम?
आदर्श नारी, सुपरवूमन...
हव्याच होत्या का या बिरुदावल्या
निखळ जगण्यासाठी?
कशासाठी सिद्ध करत राहिलो स्वतःला,
पुन्हा पुन्हा जखमी होत?
त्वचा सोलवटून घेतली तरी
नाही मिळत काही उत्तरं कधीच.
बयो,
हे कळतं ना तेव्हा
बदललेलं असतं खूप सारं!
आपण मरत गेलेलो असतो हळूहळू
अनेक निकषांवर स्वतःला घासताना
जखमाच जखमा दिसायला लागतात
आणि लाल लाल ओघळ डोळ्यातले!
बयो, तेव्हा एकच करायला हवं,
थांबायला हवं,
एक रेषा ओढायला हवी
आपल्याचभोवती,
स्वतःला कधीतरी
न्याय देता यायला हवा
केवळ याचसाठी!
- स्मिता

रविवार, 12 मार्च 2017

छुअन

वो सांसोमे समाया हुआ आपका नाम
और धडकनोमे बसी हुई तमाम यादें।
वो हाथ छुटते वक्तकी एक अजबसी घुटन
और तन्हा तन्हा बिताई हुई कितनी राते।
वो रातकि सियाहीमे डुबा हुआ सहमा चांद
और तकियेसे लिपटे हुए कुछ सुखे आसूं।
वो तेरा ना मिलकर भी साथ साथ रहना
और उम्रभर कि एक प्यासी कहानी।

छुअन सिर्फ जिस्मकी कहां होती है मेरे प्रिय?
                     - स्मिता पाटील

शुक्रवार, 20 जनवरी 2017

बघता बघता

बघता बघता
माझ्या शहरातले रस्ते
कसे बदलत बदलत गेले!

काहींनी आपले वळण
बदलून टाकले,
काही फक्त
ओळखीपुरतेच उरले,
काहींनी आपल्या पुसटशा
खुणा ठेवल्या,
तर काही अचानक
समोर आले अन्
किती जवळचे झाले!
काही असे लांब गेले की
आठवणीतही नाही उरले.
ज्या रस्त्यांशिवाय कधी
नजर फिरली नाही
ते आता कुठे गेले?
कसे इतके परके झाले?
ज्या रस्त्यांवर फुलायची
साधी सुंदर नितळ गाणी
झगमगत्या दुनियेत
कसे इतके निर्जीव उरले?

चालायचंच...
आयुष्यात आलेल्या
नात्यांचं तरी
दुसरं काय झालंय?
                                    - स्मिता

बुधवार, 12 अक्टूबर 2016

नव्यानं रुजताना

व्याकूळ करणाऱ्या 
अनेक क्षणांपैकी 
एक क्षण 
तुझ्याही विरहाचा,
गाव सोडताना...

जुन्या आठवणींच्या नावा 
पाण्यात सोडताना,
गलबलताना, 
मुसमुसताना,

एक दिवस बेसावधपणे
अंगणात तुझा दरवळ
भरून आलेला...

एकदम
आश्वस्तच करून गेलास ना
नव्या गावात 
नव्यानं रुजताना...
- स्मिता

मी मातीच्या जातीची!


‘ए, डोळे मिट ना, एक गंमत आणलीये तुझ्यासाठी! पटकन ग, किती उशीर करतेस?’ उत्साहाचं एक भिरभिरं माझ्या पुढ्यात कित्येक दिवसांनी येऊन बोलत होतं. ‘अगं हो हो, जरा थांब ना! हातातलं काम पुरं होऊदेत!’ माझ्यातली कर्तव्यदक्ष गृहिणी बोललीच. पण भिरभिर्‍याला दम कुठला निघायला? तिनं मला ओढलं तिच्यापाशी! मी डोळे मिटून हात समोर केले. ते तिनं उलटे केले, काहीतरी लावलं अन् म्हणाली, ‘थोडंसं थांब हं. मग एक खोल श्वास घेऊन हा वास घे.’ मी तसंच केलं आणि आहा...! तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब पडताच माती मोहरुन जाते, गंधित होते! तोच हा वास ‘मृद्गंधा’चा! कुणीतरी तो वास बंदिस्त केला कुपीत आणि माझ्या सखीनं तो मला दिला तिच्या माझ्या नात्याच्या सुगंधित आठवणींसाठी! मृदगंधाचं अत्तर माझ्यासाठी ठेऊन सखी निघून गेली! माझ्या मनात मग दरवळायला लागली मातीच्या जातीच्या बाईची असंख्य रुपं!
माती! सृजनाचं लखलखीत रुप अनंत काळापासूनचं! आपल्या पोटात ती सामावून घेते अबोध अवस्थेतलं बीज! त्याच्या रुजण्यानं शहारते, मोहरते अन् मग फळते, फुलते! आपल्या पोटातून सृजनाच्या अगणित शक्यतांना जन्म देते! मातृसंस्कृतीच्या उदयाच्या काळातल्या स्त्रीनं मातीची ही रुपं पाहिली आणि शेतीचा शोध लावला. माती आणि आपल्यातलं साधर्म्य तिनं ओळखलं. सृजनाच्या आदिम सोहळ्याची ती तृप्त साक्षीदार बनली! शेती, त्यापाठोपाठ येणारी अवजारं, पशुपालन, शिवणकाम, विणकाम, कुंभारकाम, भांडी, अलंकार अशा अनेक गरजांच्या पोटी येणार्‍या कामांची, व्यवसायाची निर्माती बाई! बाईची सर्जनशीलता, तिच्यातला चिवटपणा, खंबीरपणा यासह अनेक गुणांनी घाबरवलंच पुरुषांना. बघता बघता त्यांनी मातृसत्ता डळमळीत केली आणि पुरुषसत्ता प्रस्थापित झाली. या सत्तेनं माती आणि बाईला आपल्या कब्जात केलं. बाईला मात्र माती कायमच जवळची राहिली! सृजनाची ही दोन्ही रुपं एकमेकांना सांभाळत राहिली!
पुढे मग स्वतंत्र, आत्मनिर्भर असणारी ती दुर्बल म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘त्या’च्या नजरेतून स्वत:ला जोखताना आपलं मूळच विसरुन गेली. निसर्गाच्या उत्सवांना साजरं करणारी ती कर्मकांडांमध्ये पार गुरफटून गेली. काळानं आपली पावलं पुढं नेली, ती पुन्हा आत्मनिर्भर बनायला लागली आणि सुरू झाली तिची तारेवरची कसरत! रुढी, परंपरा आणि तिच्यातल्या सृजनाची नवी नवी खुणावणारी क्षितिजं यात गोंधळून जायला लागली. खरंतर तिच्याआत सर्जनशीलतेचा केवढा मोठा खजिना दडलाय! फक्त तिनं स्वत:त डोकावून पाहायला हवंय!
नैमित्तिक उत्सवांच्या आनंदाला आता किनार असते दडपणाची, कधी कधी तर भीतीचीसुद्धा. प्रत्येक वेळेस आनंद साजरा करण्यासाठी कशाला हवेत उत्सवच? या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिच्या अस्तित्वाचा उत्सव तिला साजरा करता आला पाहिजे, अगदी प्रत्येक क्षणी. कारण सृजनाच्या साम्राज्याची बाईच खरीखुरी अनभिषिक्त साम्राज्ञी आहे. ती घर मांडते, फुलवते, सजवते, जपते. भांड्यांना ओळख देते, घराला घरपण देते. अनेक कलांची निर्माती होते. नात्यांना अर्थ देते. बाहेरच्या जगात कर्तृत्वाला नवा आयाम देते. जगण्याच्या प्रत्येक क्षणांना नवनिर्मितीचं आभाळ देते. आपल्या पंखांखाली विसावलेल्या पाखरांना जोजवते, वाढवते. मायेचं अक्षय्य भांडार होते. ती आई होते. ती असतेच भरुन राहिलेली चराचरात आणि अवघे चराचरही तिच्यात!
ती नभात दिनरात
कधी वेल्हाळ जमिनीत
घुमे शिवाराचं गाणं
तिच्या ग सावळ्या देहात
ती पानगळ ग्रीष्मात
कधी वसंत उत्सवात
उठे थरथर शिशिराची
तिच्या ग हळव्या मनात
ती सांजकेशरी ढगात
कधी काळोखल्या जलात
सृष्टी गोजिरे गुपित
तिच्या ग कुजबुजे कानात
ती हिरव्या रानात
कधी गोजिर्‍या उन्हात
हसरा नाचरा ऋतूसाज
तिच्या ग रंगे रंगात!

आपल्याकडचे सण, उत्सव ऋतुंच्या हातात हात घालून येतात. गणपती, गौरींच्या पाठोपाठ नवरात्र येते. फुलांच्या रांगोळीत माती विसावते, मातीच्या कुशीत धान्य बिलगतं आणि बघता बघता हिरवं चैतन्य तरारुन येतं. यावेळच्या नवरात्रात घटाच्या मातीला साक्षी ठेऊन आपण ‘ती’च्यातल्या नवनिर्मितीच्या शक्तीची तिला आठवण करूयात. स्वत:ला दुय्यम समजणार्‍या तिच्या अंतर्मनाला साद घालूयात. तिच्यातल्या सृजनाच्या असंख्य शक्यतांची तिला जाणीव करून देऊयात. यंदा एवढं नक्कीच करुयात!
- स्मिता पाटील

थमसी जिंदगी



कभी जब शाम
तुम्हारे नाम
हुआ करती थी।
उस एक शाम
तुमने कहा था
बस अब इंतजारकी
चंद घडियां
और सारी सहरें हमारी।
जिंदगी बस थमसी गयी
उन पलोंमे।
फिर एक शाम...
तुम ओझल हो गये आंखोंसे
इतने दूर, इतने दूर चले गये...
अब न कोई शाम
कानोंमे गुदगुदी करती हैं।
अब न कोई सहर
आंखोंको झिलमिलाती हैं।
थमसी गयी थी जो जिंदगी
अ भी त क लौ ट के न हीं आ यी।
-स्मिता

आमची गाथा

‘आई ग, मी पण बेबी असताना असंच दूध पीत होते का?’ गाथा माझ्या मांडीवर बसून विचारत होती. आदल्या दिवशी एका बाळाला त्याची आई पाजवत असताना तिने पाहिलं होतं. मन घट्ट केलं आणि म्हणाले, ‘ नाही ग सोनू, इतकी छोटी असताना तू नव्हतीस माझ्याजवळ. राणीआजीकडे होतीस.’
‘ मग तिथे असं पीत होते का?’
‘नाही ग, तिथेही बाटलीने दूध प्यायचीस. आणि घरी आल्यावर पण बाटलीनेच.’ माझ्या उत्तराने तिचं समाधान झालं आणि ती शाळेला पळाली. मग मात्र माझा बांध फुटलाच. अजून कितीदा तिला वास्तवाची अशी कठोरपणान जाणीव करून द्यावी लागणार आहे कुणास ठाऊक? पण आत्ता भावनेच्या भरात खोटं बोलणं म्हणजे तिचं भलं नाही हेही उमजतंय. माझ्या हृदयातलं बाळ गाथाची आई होण्याचा हा छोटासा समृद्ध करणारा प्रवास.
गाथा तिच्या घरी आली त्याला २१ऑगस्ट २०१५ला तीन वर्ष झाली. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच २२-२३ व्या वर्षी घेतला होता चतुरंगमधल्या एका लेखामुळे. लग्न ठरवताना मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अनिलला सांगितलं तेव्हा त्यालाही हा निर्णय आवडला. लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होईल त्याच्या अपोझीट सेक्सचं मूल दत्तक घ्यावं असं मला वाटलं. मात्र पत्रकारितेच्या हेक्टिक शेड्यूलमुळे नंतर माझी तीन अबोर्शंस झाली. मूल व्हावं म्हणून कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची नाही अशा विचारानंतर दत्तक प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली. कागदपत्रांची पूर्तता करता करता जीव रडकुंडीला आला होता नुसता! त्यानंतर वेटिंग पिरीयड तब्बल अडीच वर्षे होता. दर वेळेस फोनाफोनी आणि निराशा. मला होणारा त्रास नवऱ्याला पाहवेना म्हणून त्याने दुसरीकडे चौकशी सुरू केली असताना त्याला एकानी सांगितलं की दोन - तीन लाख रु देणार असाल तर बाळ लगेच मिळेल. आम्हाला अजबच वाटलं. आम्हाला आमचं बाळ कायद्याच्या चौकटीत राहूनच पाहिजे होतं, विकत घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की कितीही त्रास झाला तरी चालेल पण असे पैसे देणार नाही. शेवटी एके दिवशी शांतपणे विचार केला की आता नाद सोडून देऊयात आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया. आणि आश्चर्य म्हणजे अगदी त्याच दिवशी दुपारी संस्थेतून फोन आला की बाळ बघायला या. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन गाथा घरी आली. सहा महिन्यानंतर बरेचसे रिपोर्ट चालत नसल्यामुळे पुन्हा काही टेस्ट्स, आणि आर्थिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना आणि आत्ताही वाटतं की दत्तक घेणं ही इतकी वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की बरेचजण अर्ध्या वाटेतूनच परत फिरतात. एकतर अजूनही दत्तक मूल ही कल्पनाच बऱ्याचजणांना पचत नाही. जे पुढे जातात त्यांना या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. मात्र मुलांना जन्माला घालणं ही आपल्याकडे किती सहजपणानं होणारी घटना आहे! ना फारसा विचार, ना कोणती प्रक्रिया. जाणीवपूर्वक विचार करून मूल जन्माला घालणारे अजूनही खूप कमी लोक्स आहेत. दत्तक घेण्याचा निर्णय ते प्रत्यक्ष गाथा घरी आल्यानंतरचा काळ यात अनेक बरे वाईट अनुभव आले. दत्तक प्रक्रिया सुरु असताना एका मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, 'अग, मुलांची एवढीच हौस असेल तर एखाद्या अनाथाश्रमात जाऊन मुलांशी खेळत जा. घरी मात्र आणू नकोस बाई. दत्तक मुले फार वाईट असतात. आपली मुले ती आपलीच मुले ना शेवटी!' गाथाला घेऊन येण्यासाठी आम्ही सोलापूरला निघण्याच्या आदल्या दिवशी पुण्यातल्या काही पत्रकार मैत्रिणींची मीटिंग होती. मी जातेय हे ऐकल्यावर एकजण म्हणाली, 'ए अजिबात घेऊ नकोस बरं दत्तक. आमच्या ओळखीच्या एकांना खूप त्रास दिलाय दत्तक मुलाने.' उद्या बाळ घरी येतंय हे कळूनही ती असं बोलत होती. माझ्या ओळखीच्या एका डॉक्टर बाईंनी तर दत्तक मूल कसे वाईटच असते याचं एक भयंकर चित्रच उभं केलं. गाथा घरी आल्यावर भेटण्यासाठी दत्तक मूल कसं असतं या उत्सुकतेपोटी बघायला बरेच आले आणि वर हे बोलूनही दाखवलं. एक आयटीतली प्रेग्नंट बाई म्हणाली, ' असं उचलून आणलेल्या मुलाला माया लागते का हो?' हे खरंच तिच्या तोंडचं वाक्य आहे, एक शब्दही मनाचा नाही. मी अक्षरशः अवाक ! एक मित्र म्हणाला, 'आम्हाला बऱ्याच प्रयत्नांनी मूल झालं. एकदा दत्तक घेण्याचा विचार मनात आला होता पण सुदैवाने (?) ती वेळ आली नाही. आणि मुलगी का घेतलीस? मुलगा तरी घ्यायचा. (घ्यायचा? बाजार आहे का हा?) बरं, मुलगी तुझ्यासारखी आहे का अनिलसारखी?' अनिल गोरा आहे आणि मी सावळी. मी सांगितलं, माझ्याहून सावळी आहे, तर लगेच तो म्हणाला, ' घिऊन घ्यायची मुलगी तर गोरी तरी घ्यायची ना किमान!' मी मनात म्हटलं, बर झालं, याने दत्तक घ्यायचा जास्त विचार नाही केला ते! एक मूल सुटलं अशा विचारसरणीच्या लोकांमधून. एक ओळखीचे काका भेटले रस्त्यात. तेही असेच म्हणाले, 'मुलगी कशाला, मुलगा तरी घ्यायचा दत्तक!' एक पत्रकार मैत्रीण म्हणाली, ' मुलगी घेतलीस ते छानच ग, पण तिची जात वगैरेचं काय ग आणि तिची हिस्ट्री?' आम्ही जात- धर्म मानत नाही आणि ती आता आमच्याच जातकुळीची झाली ना ग, तिची हिस्ट्री आता आमच्यापासूनच सुरू, असं मी म्हटल्यावर सुद्धा तिनं तिचा जात-पातीचा हेका सोडला नाही. माझी एक नातेवाईक व तिच्या नवऱ्याला तर हा निर्णय अजिबात आवडला नाही, त्यांच्या मते असं मूल आणण्यापेक्षा नातेवाईकांमधलं मूल दत्तक घ्यायचं. ती भेटायला आली तेव्हा एकूण चांगलं चित्र बघितल्यावर तिने घरी जाऊन मला फोन केला आणि मला आवडले नव्हते ते चुकीचे होते असं मोकळेपणानी कबूल केलं. एका जवळच्या आजोबांनी एक वर्षभर गाथाला जवळ घेतलं नव्हतं. (आता मात्र खूप लळा लागलाय) एका ग्रुपमध्ये गाथाला स्वावलंबी करण्याच्या हेतूने मी काही बोलले होते तर एकजण पटकन म्हणाली, 'तू असं वागू शकतेस कारण ती दत्तक आहे ना, तू जन्म दिला नाहीस तिला.' आम्ही पालक अभ्यास मंडळ सुरु केलं. सहा महिन्यांनंतर जे पालक १-२ दा आले होते पण नंतर आले नाहीत त्यांना फोन करत होते तेव्हा एक दत्तक बाबा मला म्हणाले, 'हे बघा आम्हाला नाही वाटत अशा अभ्यास मंडळाला यावं असं कारण आम्ही त्याला आमचं आडनाव दिलंय हेच आमच्या दृष्टिनं खूप मोठ काम केलंय.' हे सगळं ऐकताना माझ्यातल्या आईला खूप वाईट वाटायचं, अजून वाटतं. किती असंवेदनशीलता! मधल्या काळात स्त्रीभ्रूण हत्येच्या इतक्या केसेस उघडकीस आल्या तेव्हाच आम्ही मुलगीच घरी येणार असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि संस्थेला तसं सांगितलं. दत्तक मुलं वाईट असतात तर मग जे जे वाईट कामे करतात ती सगळी दत्तकच असतात का? आणि अशी किती दत्तक मुलं या लोकांनी पाहिलीत? मुलांवर असं लेबलिंग करणं किती अमानुष आहे! मुलांना जन्म देऊनच आई होता येतं का? मुलगा- मुलगी, काळी - गोरी, जात -धर्म अशा मनातल्या भिंती तर अजून भक्कमच आहेत. गाथाला घरी घेऊन येण्याआधी आठ दिवस आम्ही दोघं संस्थेत रोज दिवसभरासाठी जायचो. तिच्याशी खेळायचो. त्यावेळी इतर मुलं हात पसरून मला पण घ्या म्हणून मागे लागायची, रडायची. तिला घरी घेऊन येताना एकीकडे आनंद आणि दुसरीकडे या सगळ्या मुलांना मी नाही न्याय देऊ शकत या जाणिवेनं इतकी रडलेय मी! आजही अनेकदा जेव्हा संस्थेत जाते तेव्हा सगळी मुलं आपल्याला स्पर्श करायला धडपडत असतात, आपल्याकडे झेपावत असतात, तेव्हाही गलबलून येतं. घरी आल्यानंतर गाथा बराच काळ माझ्या कुशीत झोपायची नाही, बेडच्या जवळच्या खिडकीच्या गजांना धरून झोपायची. कारण संस्थेत पाळण्यात अशीच झोपतात ना मुलं. तेव्हाही खूप वाईट वाटायचं पण तिला तिचा वेळ घेऊ दिला आम्ही. आता ती मस्त कुशीत झोपते. ती दोन वर्षांची असताना ढगांच्या गडगडाटानं घाबरायची तेव्हा तिला तिच्या काकूने सांगितलं होतं की, अजिबात घाबरायचं नाही, ढग आनंदानं टाळ्या वाजवत असतात. एकदा मी आजारी होते. आम्ही दोघी शेजारी शेजारी पडलो होतो. जोरात गडगडत होतं. मला माहीत होतं की गाथा जागी आहे ते, पण मग ती मला झोपू देणार नाही म्हणून मी तशीच पडून राहिले. अर्ध्या तासानं मी तिच्याकडे पहायला आणि तिने माझ्याकडे पहायला गाठ पडली. तेव्हा इतक्या केविलवाण्या आवाजात ती म्हणाली, 'आई, धग आपल्याला काइ नाई कलत, ते ताल्या वाजवत अशतात.' माझं बाळ किती घाबरून गेलं होतं, तरीही तिनं मला उठवलं नाही, तशीच पडून राहिली आणि मी मात्र झोपण्याचं नाटक करत होते. किती अमानुष वागले मी! संस्थेतही छोटी छोटी बाळ असतात, किती प्रकारचे वेगळे वेगळे आवाज त्यांच्या कानावर आदळत असतील, त्यांना भीती वाटत असेल पण त्यांना त्यावेळेस घट्ट जवळ घेणारं कोणीच नसतं, या विचारांनी आजही मला खूप गलबलून येतं. संस्थेतल्या आया, मावशा इतक्या मुलांना कशा पुऱ्या पडणार? घरात एक मूल आणि त्याच्या भोवती बरीच माणसं आणि याउलट स्थिती संस्थेत. मला वाटतं, ज्या वयात सर्वात जास्त स्पर्शाची ऊब हवी असते मुलांना त्याच वयात ते याला मुकतात त्यामुळे स्पर्शाची खूप जास्त गरज असते दत्तक मुलांना. ज्यांना काही काम करायचे असेल, वेळ असेल त्यांना मी सांगत असते की संस्थेत जाऊन मुलांशी खेळा, त्यांना जवळ घ्या, ती जास्त गरज आहे. दत्तक मुलांमध्ये इनसिक्युरिटीचं प्रमाण जास्त असतं. एकतर गर्भावस्थेपासूनच अस्वीकार, नाकारलेपणाची भावना. त्यात आईचा ओळखीचा आवाजच ऐकू येणं बंद होतं त्यामुळे जास्त असुरक्षित वाटतं. हे सांगताही येत नाही. ही मुलं लवकर जुळवून घ्यायला शिकतात खरं पण मनातून घाबरलेली असतात. मी हे खूप अनुभवलंय गाथाच्या बाबतीत. काही वेळा त्यामुळे थोडे वेगळे वागावे लागते या मुलांशी. अर्थात प्रत्येक मुलाचे अनुभव वेगळे. गाथा घरी आल्याच्या दिवसापासून मी तिला काही काही गोष्टींच्या माध्यमातून ती दत्तक असल्याचं सांगतेय. एक नवरा- बायको असतात, त्यांना एके दिवशी आई- बाबा अशी कुठूनतरी हाक ऐकू येते, मग ते सगळीकडे शोधतात. शोधताना त्यांना पाखर (गाथाचं आजोळ) दिसलं. तिथं राणीआजी होती, ती त्यांना एका बाळाजवळ घेऊन गेली, ते बाळच त्यांना आई-बाबा अशी हाक मारत होतं. मग बाळ तिच्या घरी आलं. आणि सगळं घर आनंदानं भरून गेलं. ते बाळ म्हणजे गाथा! एक कोकीळ आई खूप आजारी असते, तिला तिच्या गोड बाळाला सांभाळणे शक्य नसते म्हणून ती छान आई बाबा शोधत असते तेव्हा तिला कावळा कावळी दिसतात. मग त्यांच्या घरट्यात ती तिच्या पिल्लाला ठेवते. कृष्ण यशोदा अशा काही गोष्टींच्या माध्यमातून तिला आम्ही कल्पना द्यायचो. आता मात्र बऱ्यापैकी स्पष्ट सांगतो. मधून मधून पाखरमध्ये घेऊन जातो, तिचा पाळणा दाखवतो. कधी कधी आमची परीक्षा घेणारे नाजूक प्रश्न ती विचारते तेव्हा कठोर होऊन योग्य ती उत्तरे द्यावी लागतात. गाथा घरी आल्यावर मी काही क्लासेस केले. त्याचा खूप फायदा झाला मला. बाकी संवेदनशीलता तर तुमच्या रोजच्या वागण्यातून रुजते मनात मुलांच्या. त्यामुळे अनेक बाबतीत मला भरून येतं, तिची आई म्हणून. माझाच हेवा वाटतो असं संवेदनशील बाळ माझं आहे याचा! गाथा ही सर्वस्वी आमचा निर्णय आणि जबाबदारी आहेच पण तिच्यावर आमच्या जवळची सारी माणसं पण खूप प्रेम करतात, वेळ देतात याचा आनंद खूप मोठा आहे. अनेक चांगल्या अनुभवांची शिदोरीही सोबत आहे आमच्या या तीन वर्षांत. हा लेख लिहिण्याचा उद्देश आम्ही काहीतरी फार वेगळं, ग्रेट केलंय, किंवा खूप काहीतरी सोसलंय, किंवा लोक कसे अगदीच वाईट असतात हे सांगणे असा नक्कीच नाही. हे वाचून दत्तक घेणाऱ्यांचं प्रमाण वाढावं, लोकांनी अशा कुणाला बोलताना किमान संवेदनशीलतेनं विचार करावा इतकंच!
- स्मिता पाटील-वळसंगकर
smeeta.patil@gmail.com

नरा !

शरीराच्या ज्या वळणांपाशी तू
येऊन थांबतोस ना;
खरंतर
मी सुरू होते तिथेच!
सगळ्या वळणांना 
सहजतेनं स्वीकारत
मी उतरते आत आत...
मला कधीच
अडकून राहायचं नसतं
फक्त शरीरात,
फक्त दिसण्यात!
त्यापलीकडे असणाऱ्या अस्तित्वात
खोल खोल
उतरायचं असतं मला.
त्वचेच्या पलीकडे
कितीतरी असतं ना?
मी रमते तिथं!
बाईपणाची असंख्य रूपं
मी जगते, भोगते,
सांभाळते, मिरवते.
म्हणूनच मी फक्त
मादीच नसते रे सर्वकाळ!
तू मात्र कायम अडकलेला
माझ्या घाटदार वळणातच
हे नरा...!
- स्मिता

तडफड

माणसं तुटत जातात
आणि नव्यानं कळत जातात
की आपणच तुटत जातो
आणि नव्यानं कळत जातं?
संदर्भांच्या घुसळणीतून
हाती उरतं ते
आकाश असतं,
की इतकंसंच असतं
आणि आकाश
वाटत असतं?
नात्यांमधल्या गुंत्यांचा
की गुंत्यांमधल्या नात्यांचा
अर्थ लागतच नाही
तोपर्यंत
रक्तातली तडफड
अ ट ळ आहे
मित्रा!
- स्मिता 

जुन्या प्रश्नातून जाऊ नव्या उत्तराशी!

झिम पोरी झिम,
कपाळाचा भिंग
भिंग गेला फुटून
पोरी आल्या उठून
पोरीत पोरी मीच गोरी!
लेकीला गाणं शिकवता शिकवता कचकन थांबले! मीच गोरी? सावधपणे तिच्याकडे पाहिलं. काही रुजलं नाही ना तिच्या कोवळ्या मनात? मन झर्रकन मागं गेलं, विठोबाच्या देवळात! वडा-पिंपळाच्या झाडाखाली श्रावणातल्या कच्च ओल्या हिरव्या दिवसांमधला रंगलेला झिम्मा! रंगानं लख्ख गोरी असणार्या माझ्या सखीचा चेहरा या ओळीला कसा अभिमानानं अजून उजळतो हे पाहताना कीवच यायची. काळजात कळ उठायचीच तिच्याबद्दल! आणि मग वाड्यातल्या भल्या मोठ्या स्वयंपाकघरातली ताकाची चरवी आठवायची. माझी आजी लोणी काढत असायची. सुटीला गावाकडे गेले की तिचं ताक घुसळणं पाहायला भारी आवडायचं आणि लोणी खायलाही. पण ती म्हणायची, मुलीच्या जातीनं लोणी खाऊ नये. भावाला मात्र माझ्यासमोरच लोण्याचा गोळा मिळायचा. घरी- शेतावर राबणार्या गड्याबायांना कमी लेखणारी काही काही माणसंही बघायला मिळायची! असंच काहीबाही बघताना माणसांमाणसांमधले हे सगळे भेद सलायला लागले ते याच काळात! कुणी केली ही वर्गवारी?
मधल्या काळात वाटायचं, बदल होताहेत की! एवढं टोकदार काही राहिलं नाहीये! सगळ्यांमधली दरी हळूहळू कमी होतीये! पण आताशा झाकोळूनं आलंय पुन्हा! दिवसेंदिवस जास्तच विखार वाढतोय की! बाईच्या जातीनं… या वाक्यानं बराच मान मिळवलाय नव्यानं. सगळाच वरवरचा मुलामा होता का नुसता! अजून किती काळ संघर्ष करायचाय? प्रश्न आणि प्रश्नच नुसते!
.....................................
“आई ग, बघ ना माझ्या हातात काय आहे? एक गंमत आणलीये मी तुझ्यासाठी! डोळे बंद कर आधी! हं, आता हात पुढे कर! आता उघड डोळे!’’ डोळे उघडले आणि बघते तर अनेक रंगांनी माझी ओंजळ भरून गेली होती. त्यात फक्त पांढरा आणि फक्त काळा असे दोनच रंग नव्हते काही! लेकीनं तिच्या छोट्याशा कृतीनं किती भानावर आणलं मला! भविष्याच्या सोनेरी आशादायक दिवसांसाठी माझ्या हातात एक पिढी सोपवलीये मला माझ्या पूर्वसुरींनी! तिच्या माध्यमातून मी खूप काही रूजवू शकते, उगवू शकते. अनेक बदलांची नांदी ठरलेल्या माझ्या ज्ञात-अज्ञात सखींनी माझ्या हातात सशक्त प्रयत्नांचे असंख्य क्षण देऊ केलेत. त्यांचं सोनेरी भविष्य निर्माण करण्याइतकं संवेदनशील मनही दिलंय मग मी काळजी कशाला करायची? माझ्या परिघापुरते चांगले बदल मी करू शकते. उद्या हा परिघ नक्कीच विस्तारेल. ही एवढी मोठी जबाबदारी निभवायची असताना मला आशादायीच असलं पाहिजे ना! प्रश्न असणारच आहेत बाईपणासमोर असंख्य… काही नवे, काही जुनेच पण नवं स्वरूप ल्यायलेले. त्या सगळ्यांवरची उत्तरं मिळणार नाहीत कदाचित पण माझं बाईपण तावून सुलाखून निघेल इतके प्रयत्न तर नक्कीच करावे लागतील मला पुढच्या आश्वासक दिवसांसाठी!
उघडले डोळे आता बोलाविती दिशा
मनामध्ये उमलते माझी नवी भाषा
आयुष्याची गुरुकिल्ली आहे माझ्यापाशी
कोमलतेसवे आहे खड्‌ग माझ्यापाशी
जुन्या प्रश्नातून जाऊ नव्या उत्तराशी
बाई मी कशी बाई मी कशी!
श्यामला वनारसे यांनी मांडलेला हा आशावाद आणि अशी आशावादाची असंख्य रूपं आहेतच माझ्यासोबत हे सगळं निभवायला!
--
स्मिता पाटील
स्वतंत्र पत्रकार

श्रावणमोह

श्रावण अंगणी आला
परकरी पोरीचा माहेर ओढीचा
ध्यास घेऊन ओला...
अनुराधा मराठे यांच्या गोड आवाजातलं हे सुंदर गाणं कानावर पडलं आणि मन बालपणाच्या फुलपंखी दिवसांत जाऊन पोहोचलं. बाहेर पावसाची मंदस्वरात रिमझिम रिमझिम चालू असताना सगळ्या मैत्रिणी नटून थटून बोलवायला यायच्या. नाचत बागडत मग आमची स्वारी निघायची विठोबाच्या देवळात. देवळात पूजेची थाळी घेऊन अनेक बाया, मुली नव्याकोर्‍या कपड्यात आलेल्या असायच्या. तो दिवस असायचा नागपंचमीचा. पूजा करून झाल्यावर सार्‍याजणी फेर धरायच्या. झिम्मा, फुगडी, नखुल्या बाई नखुल्या अशी सारी गाणी एकापाठोपाठ सुरू व्हायची. हे सगळं खेळत असतानाच समोरच्या भल्यामोठ्या वडाच्या झाडावर बांधलेला झोका खुणावत असायचा. त्याच्यावर बसून झोके घेताना स्पर्धा लागायची; कुणाचा झोका उंच जातोय याची. मैत्रिणींच्या सोबत हा सारा आनंद लुटता लुटता मग हळूहळू श्रावण सख्याचीही ओळख होत गेली आणि श्रावणात येणाऱ्या सणांची पण. बालपणाच्या दिवसातून नवथर तारुण्याच्या दालनात प्रवेशताना तर हा श्रावण जास्तच मनभावन होत गेला. त्याच्या असंख्य रूपांनी नव्यानव्यानं कळायला लागला. तरीही तो अजून संपूर्ण कळालाय असं नाही. अजूनही तो दरवेळेस नव्या नव्या रूपात मोहवत असतोच.
श्रावण... हिरव्या रंगांची मखमली जादू अनुभवायला लावणारा चैतन्यमास. माहेरवाशिणी ज्याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघतात असा जिवलग सखा. पंचमीचे वेध लागतात तशी माहेरी जाण्याची ओढ मनाला लागते. नव्या नवरीला तर कधी एकदा माहेरी जाऊन विसाव्याचे चार क्षण अनुभवतो असं होऊन जातं. हातात किणकिणणार्‍या बांगड्या, तळव्यावर लालचुटूक मेंदीचा ताजाताजा सुवास, नव्याकोर्‍या कपड्यांचा वास आणि मनात तिच्या सख्याच्या रोमांचित करणार्‍या सुगंधी क्षणांसह तिला जायचं असतं माहेरी... आपल्या जिवाभावाच्या माणसांकडे, मैत्रिणींकडे. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर व्हायची तेव्हा तर या छोट्या छोट्या सासुरवाशिणींना हा श्रावण कधी एकदा येतोय असंच व्हायचं. पण आता काळ बदललाय. मुली नोकरी, स्वत:चा व्यवसाय करतात. रोजच्या धबडग्यातून काढू म्हटलं तरी माहेरी जाण्यासाठी वेळ काढता येत नाही. तेव्हा मात्र नकळत ‘फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले.’ अशी भावविभोर अवस्था होते आणि मग थोडावेळ कशातच लक्ष लागत नाही. सृष्टीच्या चैतन्यदायी रूपासोबतच अनेक सणांची लयलूट करणारा हा महिना. सोनेरी ऊनपावसाच्या लपंडावासह हा मास घेऊन येतो, अल्लड नव्या नवर्‍यांच्या उत्साहाला उधाण आणणारी मंगळागौर, नटखट कन्हैयाच्या विविध रूपांना जागवणारी गोकुळाष्टमी, बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्टमुट्ट करणारी राखीपौर्णिमा, कोळी बांधवांचा जल्लोष ओसंडून वाहायला लावणारी नारळीपौर्णमा अशा सणांना. आपली संस्कृती कृषिप्रधान! जो निसर्ग आपल्याला जगायला मदत करतो, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी नारळीपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा हे सणही आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची कास धरून विचारपूर्वक योजले आहेत. मनाला थांबायला शिकवणारी, मायेनं समजूत घालणारी, असीम श्रद्धेनं जीवनाला सकारात्मकतेनं सामोरं जायला शिकवणारी निरनिराळी व्रतवैकल्यं याच महिन्यात असतात. निसर्ग त्याच्या असंख्य रूपांनी आपल्याला प्रत्येक ऋतूत खुणावत असतोच मात्र त्याचं सौंदर्य सर्वात जास्त खुलतं ते श्रावणात. रखरखीत ग्रीष्मानं पोळलेली सृष्टी हिरव्या रंगाचा शालू नेसते ते याच महिन्यात. एकच हिरवा रंग, पण कितीतरी त्याच्या छटा! उन्हाळ्याच्या दिवसात झाडांवर पसरलेला फुफाटा पावसाच्या सरींनी धुतला जातो आणि आपलं हिरवंगार वैभव झाडं दिमाखानं मिरवायला लागतात. त्याचबरोबर काही काही ठिकाणी पावसामुळं साठलेलं मखमली शेवाळं, झाडांवरची कोवळी पोपटी पानं, हिरव्या गवताचा गालिचा पाहून नजरेच्या सौंदर्य भूकेची तृप्ती होते. पारिजातकाची मंद दरवळणारी तांबड्या देठाची शुभ्र नाजूक अन् देखणी फुलं, सोनचाफ्याची तनमन सुगंधित करणारी राजस फुलं, धुंद करणारा पिवळाधमक केवडा, नाजूक कण्हेर अशा सगळ्या फुलांचा वास घाणेंद्रियांना तृप्त करतो. श्रावणात सणांच्या, उपवासाच्या निमित्तानं घराघरात बनवल्या जाणार्‍या पंचपक्वान्नांनी, खाद्यपदार्थांनी क्षुधाशांती होते. असा हा श्रावण सर्व थरातल्या माणसांना वर्षानुवर्षे मोह घालणारा...
श्रावणाच्या आगमनानं प्रफुल्लित झालेल्या मनानं काही परंपरांचा, व्रतवैकल्यांचा नव्यानं विचार करावा असंही राहून राहून वाटतंय. आपल्या पूर्वजांनी त्या त्या काळानुसार काही विचार करून ठरवलेल्या या प्रथांमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार आपणही सकारात्मक बदल केले पाहिजेत. श्रावण शुक्रवारी खात्यापित्या घरच्याच बाईला जेवायला घालण्यापेक्षा एखाद्या गरीब बाईला जेवायला दिलं तर ती तृप्त होऊन दुवा देईल. पंचमीच्याच दिवशी, बैलपोळ्याच्या दिवशी, नारळीपौर्णिमेच्या दिवशी फक्त निसर्गाची, पशुपक्ष्यांशी आठवण काढण्यापेक्षा पर्यावरणपूरक जीवनशैली आपण रोजच्या आयुष्यात जगू शकतो. आपल्या कुठल्याही कृतीतून निसर्गाशी आपण नकळत प्रतारणा करत नाही ना हेही नेहमी तपासून बघण्याचं व्रत श्रावणाच्या निमित्तानं सुरू करता येईल. अशी अनेक व्रतं कल्पकतेनं आपल्याला सुरू करता येतील. याचा शुभारंभ करण्यासाठी सखा श्रावण आहेचय आपल्या सोबतीला!
स्मिता पाटील
लेखिका स्वतंत्र पत्रकार आहेत
ईमेल- smita.patilv@gmail.com

लम्हा

नाजूकसी तितलीयोंको
हथेलियोंसे छुनेकी चाह
कब हुई थी आखरी बार
ये भूलनेहीे लगे थे
कि अचानक 
एक खुबसूरतसा लम्हा
सामने आके खडा हुआ।
बोला मुस्कुराके,
देखो अब भी लिपटी हुई है
कई कहानियां तुम्हारे दामनसे।
हंसीके गुब्बारे, ख़ुशीके फव्वारे,
न जाने कितने सारे ख्वाब अधुरे।
मै तो एकही नहीं हूं
जो थकके सो जाऊं,
तुम्हारे आगोशमें।
और भी तो है कई लम्हे,
जो छुना चाहते है तुम्हे,
महसूस करना चाहते है,
तितलीयोंके रंगोंकी निशानी।
बस तुम ख्वाब देखना
बंद मत करना।
- स्मिता 

सीमोल्लंघन

लोकमत सखी मधला माझा लेख!
आजचा दिवस सीमोल्लंघनाचा ! विचारांच्या जागराचा ! मागे वळून पाहण्याचा ! सीमोल्लंघनाकडे नव्या नजरेनी पाहण्याचा ! नवरात्र सुरू झालं की मला आठवण येते माझ्या लहानपणीची. त्या काळात घरात पाय ठरायचाच नाही आम्हा मुलींचा! संध्याकाळ झाली की वेध लागायचे भोंडल्याचे. नटूनथटून एका घरातून दुसऱ्या घरात जाताना आम्ही साऱ्याजणी उत्साहानं नुसत्या चिवचिवत असायचो. अंगणात गडद रंगाच्या पाटावर पांढऱ्याशुभ्र रांगोळीनं सुबक हत्ती रेखलेला असायचा. त्याच्याभोवती फेर धरत, हातात हात गुंफत भोंडल्याची गाणी चढाओढीनं म्हटली जायची आणि मग खिरापत ओळखण्यासाठी केलेला दंगा. दसऱ्यापर्यंत आम्ही पूर्ण गल्ली आणि ती ओलांडून अनेक ठिकाणी भोंडला खेळायचो. दसऱ्याच्या दिवशी घरातले पुरुष सीमोल्लंघन करून यायचे, मग गव्हातांदळाचा चौक मांडला जायचा. आम्ही लहान मुलं आणि पुरुष मंडळी त्यात बसायचो. मग औक्षण केलं जायचं. आपट्याची पाने एकमेकांना द्यायचो. एकूण धम्माल वाटायची !
हळूहळू भोंडल्यांच्या गाण्यांमधल्या शब्दांच्या गमती ओलांडून त्यातल्या अर्थांचा विचार सुरू झाला. ज्या काळात ही गाणी रचली गेली, त्या काळात मुलींची लग्न लवकर होत असायची. चिमुकल्या सासुरवाशिणी अशा सणांच्या निमित्तानं आपल्या समवयस्क सखींशी हितगूज करायच्या, मन मोकळं करायच्या. माजघराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात हे सणच तर त्यांना घेऊन जायचे.
माजघरातून बाहेर येत अंगणाची कुंपणं ओलांडून बाहेरच्या जगात बाई आली. हळूहळू अनेक क्षेत्रांमध्ये तिनं प्रवेश केला. यशाची शिखरं काबीज केली. अगदी पुरुषी वर्चस्वाच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रातही तिनं आपला ठसा उमटवला. फक्त विजयादशमीच्या मुहूर्तावरच अवलंबून न राहता सीमोल्लंघन तिनं खऱ्या अर्थानं केलं प्रत्येक क्षणाला ! काळानुसार ती बरीच बदलली. तिच्या कपड्यांमध्ये, राहणीमानात बदल झाला.
कपड्यांमध्ये आधुनिकता आली पण काही वेळा ती अजूनही मागेच राहिलीये हे बऱ्याच वेळा जाणवतंय. एका कार्यक्रमाची आठवण मला दरवेळेस हटकून येते. समाजात ठसा उमटवणाऱ्या काही महिलांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम चालू होता. पुरस्कार वितरण ज्यांच्या हस्ते होतं त्या बाई वयाच्या साडेसतराव्या वर्षी विधवा झालेल्या. पदरात तान्ही मुलगी. दुःखाचा डोंगर कोसळला पण त्या हिमतीनं उभ्या राहिल्या. छोट्या मोठ्या नोकऱ्या करत परीक्षा दिल्या. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करून नाव कमावलं. मुलीला उच्च शिक्षण दिलं. नंतर समाजाचं देणं फेडण्यासाठी काम सुरू केलं. कुणीही त्यांच्यापासून हिंमत घ्यावी असं हे व्यक्तिमत्व. कार्यक्रमात पुरस्कार मिळालेल्या बाईला आधी कुंकू लावून मग सत्कार असं स्वरूप होतं. एका बाईनं त्यावेळेस यांना हातानं थांबवलं आणि भर कार्यक्रमात तुम्ही मला कुंकू लावायचं नाही असं सांगितलं. सगळे अवाक् होऊन बघतच राहिले. इतक्या दुखावल्या गेल्या त्या बाई अशा असमंजस वागण्यानं! त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पुढे भाषण करताना. अशा अनेक कार्यक्रमात एक बाई म्हणून आपण दुसऱ्या बाईवर अन्याय करतो आहोत असा विचार चुकूनही येत नसेल का मनात? त्या कार्यक्रमात मी मात्र मनोमन निश्चय केला, की जिथे बाईचा तिला नवरा असण्यानसण्यावरून अपमान केला जातो असा हळदीकुंकू समारंभ मी कधीच करणार नाही.
खरंतर बाईपण किती दिमाखाचं, सृष्टीच्या जवळचं ! आदिमायेचं रूप म्हणजे बाईपण. एकीकडे देवी म्हणून पूजा करायची आणि दुसरीकडे किती भिंती? जातीधर्माच्या, उच्चनीचतेच्या, वर्ण- वर्गभेदाच्या, रंगरूपाच्या, श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या. नवरा मेला म्हणून, घटस्फोट झाला म्हणून, मूल नाही म्हणून, फक्त मुलीच झाल्या म्हणून, अशा अनेक कारणांवरून आजही समारंभात, सार्वजनिक ठिकाणी, घरात बाईचा अपमान केला जातो. अनेक धार्मिक कार्यक्रमात तिला डावललं जातं. हे सोसणारी बाई मनातून खूप खचून जात असते हे आपण कधी समजून घेणार? या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून तिचा विचार केला पाहिजे, तिचा स्वभाव, तिचे गूण, तिचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे हे आपण कधी लक्षात घेणार? विचारांच्या या सीमा आपण कधी ओलांडणार?
आपण स्वतःचा कसा विचार करतो, स्वतःला न्याय देतो का? इतरांसाठी धडपडून कष्ट करताना स्वतःवर पण प्रेम करतो का? हे सतत तपासलं पाहिजे. त्याचबरोबर एक बाई म्हणून दुसऱ्या बाईवर आपण कळतनकळत अन्याय करत नाही ना हेही बघितलं पाहिजे. देवीच्या नावावर एकीकडे उपवास करायचे आणि दुसरीकडे तिच्या रुपात असलेल्या जिवंत बाईला वाईट वागवायचं. पूजेच्या नावावर आपण करत असलेल्या कामांमध्ये कुचराई करायची हे नाही ना योग्य ! ज्या काळात धार्मिक रूढी परंपरा निर्माण झाल्या त्या वेळची सामाजिक स्थिती वेगळी होती, गरज वेगळी होती. विशिष्ट उद्देशानं त्या निर्माण झाल्या. पण आता काळ किती बदलला आहे ! जुन्या परंपरांचा नव्यानं विचार केला पाहिजे. आताच्या काळाशी त्या सुसंगत आहेत का हे बघितलं पाहिजे. कालबाह्य झालेली कर्मकांडे कशाला करत राहायची? यासाठी त्यांचा अभ्यासही केला पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि उत्तरंही आपणच शोधली पाहिजेत.
कुटुंब, मुलं यांचा विचार करताना आवश्यक ती स्पेस आपल्या नात्यांना मिळाली पाहिजे. आपल्या घरात आपल्या मुलांना खऱ्या अर्थाचं विचारांचं मोकळेपण मिळालं पाहिजे. पारंपारिक चौकटींच्या पलीकडे जाऊन मुलांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्याविषयी कृतज्ञता मनात असली पाहिजे. जमेल ते छोटं मोठं सामाजिक काम केलं पाहिजे. समाजोपयोगी नवीन उपक्रम सुरू केले पाहिजेत. निसर्गस्नेही जगता आलं पाहिजे. पर्यावरणाला ओरबाडत आपलं सुखं मिळवत राहणं कोणत्या संस्कृतीत बसतं? आपली संस्कृती तर निसर्गाच्या जवळ राहण्याची, त्याच्याशी कृतज्ञ राहण्याची शिकवण देते.
सर्व भेदांच्या सीमा ओलांडून आयुष्य जाणीवपूर्वक, अर्थपूर्ण जगणं, त्यासाठी नवनवे अनुभव घेत राहणं हे फार महत्वाचं आहे. यानं जगण्याला अर्थ मिळतो. माणसांना भेटणं, पुस्तकं, कार्यक्रम, निरनिराळे उपक्रम यातून नवीन शिकणं होतं, जे आपल्याला समृद्ध करतं. असं विचारांनी समृध्द होणं जास्त महत्वाचं. आपल्याच कर्मठ, जुनाट विचारांना प्रश्न विचारत सध्याच्या काळाशी सुसंगत असा नवीन विचार करायला लागणं आणि त्याप्रमाणे कृतीही करत राहणं हे खऱ्या अर्थाचं सीमोल्लंघन ठरेल. यासाठी हे आदिशक्तीच्या रूपा, तुला खूप खूप सदिच्छा !

 -स्मिता पाटील
smita.patilv@gmail.com

रविवार, 9 अगस्त 2015

सृजनांच्या वाटांचा प्रयोगशील प्रवासी


'मॉडर्न' मधला 'बहर'


रोह्यातल 'परिवर्तन'


शिकणे व्हावे आनंदगाणे!


'बल'दायी विद्या 'व्रत'


जिणं घेऊ दे आकार


बळ आनंदानं जगण्याचं...


मी प्रेमात पडलेय...


माझ्याच अंगणी आनंदाचं झाड!


उत्सव 'असण्या'चा !


सुंदर आहे जगणं...


बयो, आता तरी जागी हो!



शुक्रवार, 25 मई 2012

क्षण क्षण

तुझा अनिवार स्पर्श 
माझा उभा देह 


कापराचा...

तुझे हळुवार शब्द 
माझा क्षण क्षण 


गोठण्याचा...

बुधवार, 23 मई 2012

बयो

तसं सर्वार्थानं आपलं असं
कुणीच नसतं ना बयो, 
जे सोबत असतं आपल्या 
काळीज उलताना, फुलताना...
आतड्यांमधून उठणाऱ्या 
कल्लोळांना 
स्वतःलाच बांध घालावा 
लागतो बयो.
आतून उगवणाऱ्या 
हिरव्या जखमांवरची 
निळीशार फुंकर 
आपली आपणच 
व्हावं लागतं बयो,
स्वतःशीच लढताना.
शिकशील तूही हळूहळू.
पण तोपर्यंत नव्यानं
फुटशीलही.
सोपं नसतंच काही 
पण तितकं अवघडही नसतं काही तसं,
ज्यासाठी करावा लागतो
प्राणांचा अट्टाहास असं...
निरगाठी उकलाव्यात तसं 
आयुष्यही उलगडत जातं मग हळूहळू 
समंजसपणाच्या तीरावर...
                         - स्मिता.

शुक्रवार, 18 मई 2012

हळवी ओंजळ

'अन्न, वस्त्र, निवारा 
याच माणसाच्या मुलभूत गरजा 
आणि चालणारा श्वास हेच अंतिम सत्य ,
बाकी सगळं झूठ!'
तुम्ही म्हणालात ठामपणानं.

हो कबूल,
पण श्वासांइतकंच आणि 
श्वासांपलीकडेही 
महत्त्वाचं असतं ना खूप काही,
जे रुजतं हिरव्यागार सळसळीतून,
उसळतं बेभान लाटांमधून,
मगतं दूर दूर चालत जाणाऱ्या,
लाल, करड्या पाऊलवाटांमधून,
हुरहुरतं गच्च गच्च स्पर्शातून,
मावळतं कुणाच्या तरी वियोगातून.
असतं महत्त्वाचं खूप काही,
मीही म्हटलं ठामपणानं.
तर तुम्ही उगारलात आसूड छद्मी हास्याचा
अन मांडत राहिलात आपलाच मुद्दा
दुराग्रहानं, त्वेषानं...
अनेक स्वप्नभरल्या डोळ्यांना
हिणवत राहिलात तुम्ही अनंत काळ...
पण आता मीही ठाम
नाही पटवून द्यायचं
तुम्हाला काही पुन्हा पुन्हा,
या मुद्द्यावर!
दगडावर माथा आपटताना,
रक्तबंबाळ होणं
टाळायला शिकलं पाहिजे,
या मुद्द्यावर!

श्वासांपलीकडच्या आणि श्वासांइतक्याच
महत्त्वाच्या खूप काही गोष्टींसाठी
असावी लागते आपल्याजवळ एक हळवी ओंजळ...
ती तर नाही ना हिरावून घेऊ शकत 
कुणी आपल्यापासून?
आता मीही ठाम या मुद्द्यावर!!!!
                  - स्मिता.

शुक्रवार, 30 मार्च 2012

ऐना बिलोरी

आयुष्य 'भोग'ताना सुखाचे
गाणे म्हणावे लागते
जपत उन्हालाही कधी
चांदणे म्हणावे लागते !!

चेहरा स्वतःचा जेव्हा
अचानक परका परका
वाटेतल्या काचांना
ऐना बिलोरी बनावे लागते !!

कधी कुणाच्या दारावरुनी
सांज उदासून जाता
चांदणे ओंजळीत घेताना
उरी फुटावे लागते !!
                           - स्मिता  

शनिवार, 4 फ़रवरी 2012

अस्वस्थ कहाणी

तुझ्या माझ्या संदर्भातले 
सगळे ऋतू नादावतात मला...
तसे तर चिंब चिंब श्रावणधारांमध्ये 
वैशाखवणवा होऊन जळण्याचे प्राक्तनही
तूच तर दिलेले असते मला 
आयुष्यभरासाठी आंदण म्हणून...

उदबत्ती जळताना 
सुगंध उधळते आसमंतात 
माणसासाठी, देव म्हणून असलेल्या 
त्याच्या श्रद्धेच्या प्रतीकासाठी.
मागे राहिलेली राखच नसते कुणाची,
कुठल्या वासाची!
अंगारा म्हणूनही कधी भाग्य नसते तिचे!
पण जळताना ती उधळून देते
आपले सुगंधीपणाचे सारे आविष्कार...

जळण्याचे उदबत्तीचे भाग्य दिल्याबद्दल 
आभार मानायचे आहेत तुझे
पण शब्दच सापडत नाहीयेत...
असं कर, 
भिजल्या अंतराचे 
थोडे हळवे स्पर्शच घेऊन जा.
ते सांगतील तुला अनंत जन्मांची,
जळण्या- उरण्याची, 
उधळून दिलेल्या सुगंधाची 


अस्वस्थ कहाणी...
                           -स्मिता  

बुधवार, 25 जनवरी 2012

ही कुठल्या जन्माची अस्वस्थता

ही कुठल्या जन्माची 
अस्वस्थता 
भरून राहिलीये
अवघ्या नसानसांत 
की जिचा उगमच
कळत नाहीये 
आणि शांतवणारा अंतही?
हे कुठले अज्ञात झरे
वाहताहेत आतून 
अंतरातले कुठले स्त्राव
कुण्या जन्माचे?
की ज्यांच्याविना
अपूर्णच राहिलं असतं
जगणं की पुन्हा पुन्हा
मरून उरणं?
                                       -स्मिता.

समजुतीच्या वाटेवर

समजुतीच्या वाटेवरचा माझा प्रवास 
नक्की कधीपासूनचा?
पण जाणिवेच्या लख्ख प्रदेशातलं
पहिलं गाव तर तुझंच...
आणि मग गावं बदलत गेली,
माणसं वाढत गेली.
प्रवास अजूनही चालूच!
आता जीव थकलाय 
अन वाट सरता सरत नाहीये.....
                            -स्मिता.

मंगलवार, 8 फ़रवरी 2011

सखी ही धुक्याची...

लपेटून कोवळी वस्त्रे उन्हाची 
कुठे चालली सखी ही धुक्याची...

उभा डोंगरी निळा सखा गं,
लाजून जाय किनार ढगाची...

ऐन भराचा हा रान फुलोरा, 
गळा तहान गं सात जन्मांची...

तुझ्या पावलांना सांभाळ राणी, 
उडून जाईल झोप अंगणाची...

वाटेत लागेल गाव स्वप्नांचा,
मिटू नको गं कवाडे मनाची...
                              -स्मिता.        

मंगलवार, 28 सितंबर 2010

पाऊस...

पाऊस गच्च धारांचा 
पाऊस कच्च झाडांचा 
त्याच्या तिच्या मनातल्या 
टपटप पागोळ्यांचा...

पाऊस अवखळ मनाचा 
पाऊस अल्लड वयाचा 
थेंबाथेंबातून नाचून 
थरारलेल्या नभाचा...
             
पाऊस भिजल्या पापणीचा 
पाऊस थकल्या डोळ्यांचा 
वाट पाहता पाहता 
निजल्या उदास रातीचा...

पाऊस चिंब रानाचा  
पाऊस व्याकूळ प्राणाचा 
दूरच्या गूढ वाटेसारखा 
माझाही एकटेपणाचा...
                     -स्मिता

दिलासा

तुझ्यापासून... तुझ्यापर्यंतचा 
माझा प्रवास 
मला घेऊन येतो 
माझ्यापासून... माझ्यापर्यंत.


शक्यतांच्या अनेक किनारयांना
नुसताच स्पर्श करून 
परत येताना जाणवतं, 
भिजलेलं असतं मन, 
भिजलेला असतो देह 
आणि अवघा जन्मच...

अकार, मकारापासून
निर्विकारापर्यंत जाताना 
तू आहेस... असतोस 
माझ्यासाठी... माझा... 
हा दिलासा व्यापून उरतो 
अवघ्या असण्याला


आणि नसण्यालाही ...  
               -स्मिता