श्रावण अंगणी आला
परकरी पोरीचा माहेर ओढीचा
ध्यास घेऊन ओला...
अनुराधा मराठे यांच्या गोड आवाजातलं हे सुंदर गाणं कानावर पडलं आणि मन बालपणाच्या फुलपंखी दिवसांत जाऊन पोहोचलं. बाहेर पावसाची मंदस्वरात रिमझिम रिमझिम चालू असताना सगळ्या मैत्रिणी नटून थटून बोलवायला यायच्या. नाचत बागडत मग आमची स्वारी निघायची विठोबाच्या देवळात. देवळात पूजेची थाळी घेऊन अनेक बाया, मुली नव्याकोर्या कपड्यात आलेल्या असायच्या. तो दिवस असायचा नागपंचमीचा. पूजा करून झाल्यावर सार्याजणी फेर धरायच्या. झिम्मा, फुगडी, नखुल्या बाई नखुल्या अशी सारी गाणी एकापाठोपाठ सुरू व्हायची. हे सगळं खेळत असतानाच समोरच्या भल्यामोठ्या वडाच्या झाडावर बांधलेला झोका खुणावत असायचा. त्याच्यावर बसून झोके घेताना स्पर्धा लागायची; कुणाचा झोका उंच जातोय याची. मैत्रिणींच्या सोबत हा सारा आनंद लुटता लुटता मग हळूहळू श्रावण सख्याचीही ओळख होत गेली आणि श्रावणात येणाऱ्या सणांची पण. बालपणाच्या दिवसातून नवथर तारुण्याच्या दालनात प्रवेशताना तर हा श्रावण जास्तच मनभावन होत गेला. त्याच्या असंख्य रूपांनी नव्यानव्यानं कळायला लागला. तरीही तो अजून संपूर्ण कळालाय असं नाही. अजूनही तो दरवेळेस नव्या नव्या रूपात मोहवत असतोच.
श्रावण... हिरव्या रंगांची मखमली जादू अनुभवायला लावणारा चैतन्यमास. माहेरवाशिणी ज्याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघतात असा जिवलग सखा. पंचमीचे वेध लागतात तशी माहेरी जाण्याची ओढ मनाला लागते. नव्या नवरीला तर कधी एकदा माहेरी जाऊन विसाव्याचे चार क्षण अनुभवतो असं होऊन जातं. हातात किणकिणणार्या बांगड्या, तळव्यावर लालचुटूक मेंदीचा ताजाताजा सुवास, नव्याकोर्या कपड्यांचा वास आणि मनात तिच्या सख्याच्या रोमांचित करणार्या सुगंधी क्षणांसह तिला जायचं असतं माहेरी... आपल्या जिवाभावाच्या माणसांकडे, मैत्रिणींकडे. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लवकर व्हायची तेव्हा तर या छोट्या छोट्या सासुरवाशिणींना हा श्रावण कधी एकदा येतोय असंच व्हायचं. पण आता काळ बदललाय. मुली नोकरी, स्वत:चा व्यवसाय करतात. रोजच्या धबडग्यातून काढू म्हटलं तरी माहेरी जाण्यासाठी वेळ काढता येत नाही. तेव्हा मात्र नकळत ‘फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले.’ अशी भावविभोर अवस्था होते आणि मग थोडावेळ कशातच लक्ष लागत नाही. सृष्टीच्या चैतन्यदायी रूपासोबतच अनेक सणांची लयलूट करणारा हा महिना. सोनेरी ऊनपावसाच्या लपंडावासह हा मास घेऊन येतो, अल्लड नव्या नवर्यांच्या उत्साहाला उधाण आणणारी मंगळागौर, नटखट कन्हैयाच्या विविध रूपांना जागवणारी गोकुळाष्टमी, बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्टमुट्ट करणारी राखीपौर्णिमा, कोळी बांधवांचा जल्लोष ओसंडून वाहायला लावणारी नारळीपौर्णमा अशा सणांना. आपली संस्कृती कृषिप्रधान! जो निसर्ग आपल्याला जगायला मदत करतो, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी नारळीपौर्णिमा, नागपंचमी, बैलपोळा हे सणही आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची कास धरून विचारपूर्वक योजले आहेत. मनाला थांबायला शिकवणारी, मायेनं समजूत घालणारी, असीम श्रद्धेनं जीवनाला सकारात्मकतेनं सामोरं जायला शिकवणारी निरनिराळी व्रतवैकल्यं याच महिन्यात असतात. निसर्ग त्याच्या असंख्य रूपांनी आपल्याला प्रत्येक ऋतूत खुणावत असतोच मात्र त्याचं सौंदर्य सर्वात जास्त खुलतं ते श्रावणात. रखरखीत ग्रीष्मानं पोळलेली सृष्टी हिरव्या रंगाचा शालू नेसते ते याच महिन्यात. एकच हिरवा रंग, पण कितीतरी त्याच्या छटा! उन्हाळ्याच्या दिवसात झाडांवर पसरलेला फुफाटा पावसाच्या सरींनी धुतला जातो आणि आपलं हिरवंगार वैभव झाडं दिमाखानं मिरवायला लागतात. त्याचबरोबर काही काही ठिकाणी पावसामुळं साठलेलं मखमली शेवाळं, झाडांवरची कोवळी पोपटी पानं, हिरव्या गवताचा गालिचा पाहून नजरेच्या सौंदर्य भूकेची तृप्ती होते. पारिजातकाची मंद दरवळणारी तांबड्या देठाची शुभ्र नाजूक अन् देखणी फुलं, सोनचाफ्याची तनमन सुगंधित करणारी राजस फुलं, धुंद करणारा पिवळाधमक केवडा, नाजूक कण्हेर अशा सगळ्या फुलांचा वास घाणेंद्रियांना तृप्त करतो. श्रावणात सणांच्या, उपवासाच्या निमित्तानं घराघरात बनवल्या जाणार्या पंचपक्वान्नांनी, खाद्यपदार्थांनी क्षुधाशांती होते. असा हा श्रावण सर्व थरातल्या माणसांना वर्षानुवर्षे मोह घालणारा...
श्रावणाच्या आगमनानं प्रफुल्लित झालेल्या मनानं काही परंपरांचा, व्रतवैकल्यांचा नव्यानं विचार करावा असंही राहून राहून वाटतंय. आपल्या पूर्वजांनी त्या त्या काळानुसार काही विचार करून ठरवलेल्या या प्रथांमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार आपणही सकारात्मक बदल केले पाहिजेत. श्रावण शुक्रवारी खात्यापित्या घरच्याच बाईला जेवायला घालण्यापेक्षा एखाद्या गरीब बाईला जेवायला दिलं तर ती तृप्त होऊन दुवा देईल. पंचमीच्याच दिवशी, बैलपोळ्याच्या दिवशी, नारळीपौर्णिमेच्या दिवशी फक्त निसर्गाची, पशुपक्ष्यांशी आठवण काढण्यापेक्षा पर्यावरणपूरक जीवनशैली आपण रोजच्या आयुष्यात जगू शकतो. आपल्या कुठल्याही कृतीतून निसर्गाशी आपण नकळत प्रतारणा करत नाही ना हेही नेहमी तपासून बघण्याचं व्रत श्रावणाच्या निमित्तानं सुरू करता येईल. अशी अनेक व्रतं कल्पकतेनं आपल्याला सुरू करता येतील. याचा शुभारंभ करण्यासाठी सखा श्रावण आहेचय आपल्या सोबतीला!
स्मिता पाटील
लेखिका स्वतंत्र पत्रकार आहेत
ईमेल- smita.patilv@gmail.com

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें