कुल पेज दृश्य

शुक्रवार, 25 मई 2012

क्षण क्षण

तुझा अनिवार स्पर्श 
माझा उभा देह 


कापराचा...

तुझे हळुवार शब्द 
माझा क्षण क्षण 


गोठण्याचा...

बुधवार, 23 मई 2012

बयो

तसं सर्वार्थानं आपलं असं
कुणीच नसतं ना बयो, 
जे सोबत असतं आपल्या 
काळीज उलताना, फुलताना...
आतड्यांमधून उठणाऱ्या 
कल्लोळांना 
स्वतःलाच बांध घालावा 
लागतो बयो.
आतून उगवणाऱ्या 
हिरव्या जखमांवरची 
निळीशार फुंकर 
आपली आपणच 
व्हावं लागतं बयो,
स्वतःशीच लढताना.
शिकशील तूही हळूहळू.
पण तोपर्यंत नव्यानं
फुटशीलही.
सोपं नसतंच काही 
पण तितकं अवघडही नसतं काही तसं,
ज्यासाठी करावा लागतो
प्राणांचा अट्टाहास असं...
निरगाठी उकलाव्यात तसं 
आयुष्यही उलगडत जातं मग हळूहळू 
समंजसपणाच्या तीरावर...
                         - स्मिता.

शुक्रवार, 18 मई 2012

हळवी ओंजळ

'अन्न, वस्त्र, निवारा 
याच माणसाच्या मुलभूत गरजा 
आणि चालणारा श्वास हेच अंतिम सत्य ,
बाकी सगळं झूठ!'
तुम्ही म्हणालात ठामपणानं.

हो कबूल,
पण श्वासांइतकंच आणि 
श्वासांपलीकडेही 
महत्त्वाचं असतं ना खूप काही,
जे रुजतं हिरव्यागार सळसळीतून,
उसळतं बेभान लाटांमधून,
मगतं दूर दूर चालत जाणाऱ्या,
लाल, करड्या पाऊलवाटांमधून,
हुरहुरतं गच्च गच्च स्पर्शातून,
मावळतं कुणाच्या तरी वियोगातून.
असतं महत्त्वाचं खूप काही,
मीही म्हटलं ठामपणानं.
तर तुम्ही उगारलात आसूड छद्मी हास्याचा
अन मांडत राहिलात आपलाच मुद्दा
दुराग्रहानं, त्वेषानं...
अनेक स्वप्नभरल्या डोळ्यांना
हिणवत राहिलात तुम्ही अनंत काळ...
पण आता मीही ठाम
नाही पटवून द्यायचं
तुम्हाला काही पुन्हा पुन्हा,
या मुद्द्यावर!
दगडावर माथा आपटताना,
रक्तबंबाळ होणं
टाळायला शिकलं पाहिजे,
या मुद्द्यावर!

श्वासांपलीकडच्या आणि श्वासांइतक्याच
महत्त्वाच्या खूप काही गोष्टींसाठी
असावी लागते आपल्याजवळ एक हळवी ओंजळ...
ती तर नाही ना हिरावून घेऊ शकत 
कुणी आपल्यापासून?
आता मीही ठाम या मुद्द्यावर!!!!
                  - स्मिता.