कुल पेज दृश्य

मंगलवार, 28 सितंबर 2010

पाऊस...

पाऊस गच्च धारांचा 
पाऊस कच्च झाडांचा 
त्याच्या तिच्या मनातल्या 
टपटप पागोळ्यांचा...

पाऊस अवखळ मनाचा 
पाऊस अल्लड वयाचा 
थेंबाथेंबातून नाचून 
थरारलेल्या नभाचा...
             
पाऊस भिजल्या पापणीचा 
पाऊस थकल्या डोळ्यांचा 
वाट पाहता पाहता 
निजल्या उदास रातीचा...

पाऊस चिंब रानाचा  
पाऊस व्याकूळ प्राणाचा 
दूरच्या गूढ वाटेसारखा 
माझाही एकटेपणाचा...
                     -स्मिता

दिलासा

तुझ्यापासून... तुझ्यापर्यंतचा 
माझा प्रवास 
मला घेऊन येतो 
माझ्यापासून... माझ्यापर्यंत.


शक्यतांच्या अनेक किनारयांना
नुसताच स्पर्श करून 
परत येताना जाणवतं, 
भिजलेलं असतं मन, 
भिजलेला असतो देह 
आणि अवघा जन्मच...

अकार, मकारापासून
निर्विकारापर्यंत जाताना 
तू आहेस... असतोस 
माझ्यासाठी... माझा... 
हा दिलासा व्यापून उरतो 
अवघ्या असण्याला


आणि नसण्यालाही ...  
               -स्मिता